कविता

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे;
घेणार्‍याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे;
घेणार्‍याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे !

- विंदा करंदीकर

मराठी: 

कणा

'ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मराठी: 

विनोदी कविता

तू सुई, मी दोरा
तू काळी, मी गोरा

तू पोळी, मी भात
तू फुटबॉल, मी लाथ

तू बशी, मी कप
तू उशी, मी झोप

तू बॉल, मी बॅट
तू उंदीर, मी कॅट

मी मुंगळा, तू मुंगी
तू साडी, मी लुन्गी

तू लव्ह, मी प्रेम
तू फोटो, मी फ्रेम

तू डोकं, मी केस
तू साबण, मी फेस

तू निसर्ग, मी फिजा
तू कविता, "मी माझा"

तू घुबड, मी पंख
तू विंचू, मी डंख

तू साम्बार, मी डोसा
तू बॉक्सर, मी ठोसा

तू कणीक, मी पोळी
तू औषध, मी गोळी

तू पेट्रोल, मी कार
तू दारु, मी बार

मराठी: 

या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

मराठी: